सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले असून लॉकडाऊनचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ग्रामीण व सोलापूर शहरातील कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य विभाग करीत आहे. मध्यवर्ती गणेश मंडळे, मूर्तीकार यांच्याशी चर्चा करून आणि स्थानिक कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन शहर आणि ग्रामीण भागात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
- मंडळांनी खालील सूचनांचे पालन करणे बंधनकारक
मूर्ती खरेदीविषयक
- गर्दी टाळण्याच्या दृष्टीने श्री गणेश मूर्ती शक्यतो ऑनलाईन बुक करावी अथवा मूर्तीकारांचे गोडाऊन, दुकान, कारखाना येथून किमान 2 ते 3 दिवस अगोदर घेवून जावी.
- सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून किंवा रस्त्यावर श्री गणेश मूर्ती विक्री करता येणार नाही.
- घरगुती 2 फुटापर्यंत व सार्वजनिक गणेश मूर्ती 4 फुटापर्यंत अथवा त्यापेक्षा लहान असावी.
परवानगीविषयक
- •रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी श्री गणेश स्थापनेस परवानगी देण्यात येणार नसल्यामुळे यावर्षी कोणालाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन परवानगी देण्यात येणार नाही.
- सन 2019 मध्ये ज्यांनी परवानगी काढली असेल त्यांना अर्ज केल्यावर परस्थितीनुरुप परवानगी देण्यात येईल.
- गणेश मंडळांना डॉल्बी, बँण्डपथक, नाशिक ढोल, ढोली ताशा, झांज पथक, लेझिम पथक वापरता येणार नाही.
- उत्सवाच्या अनुषंगाने कोणालाही होर्डींग, बॅनर, पोस्टर इत्यादी लावण्यासाठी परवानगी असणार नाही.
ठिकाण व स्थापनाविषयक
- मंडळांना सार्वजनिक ठिकाणी, चौकात, रस्त्यावर मंडप घालून गणेश मूर्तीची स्थापना करण्यास परवानगी नाही.
- श्री गणेश मंदिरे किंवा कायम स्वरुपी गणेश मूर्ती ठेवलेल्या ठिकाणी स्थापना करता येईल. मात्र कोणत्याही प्रकारचे स्टेज, मंडप उभारता येणार नाही.
आरतीची वेळविषयक
- श्री गणेशाचे सकाळी व सायंकाळची आरती व पुजेस जास्तीत जास्त 10 किंवा त्यापेक्षा कमी भक्तांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन उपस्थित राहता येईल. त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
- आरतीसाठी एकाचवेळी एकत्र येण्यापेक्षा सकाळची आरती काही पदाधिकारी तर सायंकाळची आरती काही पदाधिकारी यांनी करावी.
- श्रींच्या आरतीसाठी सकाळी 07.00 वा ते 10.00 वा व सायंकाळी 06.00 ते 09.00 या वेळेमध्ये बेसविरहीत दोन छोटे (2×3 फुटाचे) स्पिकरचे बॉक्स वापरता येतील. तथापि, याबाबत संबंधित विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल.
श्री गणेश मूर्तीचे विसर्जनविषयक
- घरगुती अथवा सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे विसर्जन आपल्या घरीच अथवा स्थापन केलेल्या ठिकाणी करण्यात यावे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी विसर्जनास परवानगी असणार नाही.
मिरवणूकविषयक
- श्रींच्या आगमन, स्थापना, विसर्जन इत्यादीसाठी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही.
- कोविड-19 या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महापालिका, नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.