सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत बुधवारी रात्री आठ वाजता शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि श्रीशैल मल्लिकार्जुन यांच्या भेटीच्या प्रसंगावर आधारित “सोहळा गुरु भेटीचा ” या टुडी शोचे आयोजन करण्यात आले आहे
बुधवार 15 जानेवारी रोजी होम मैदानावर परंपरेनुसार चालू असलेल्या शोभेच्या दारू कामाचे आतिषबाजी व प्रोजेक्टरद्वारे टु. डी.शोचे श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे . मागील तीन वर्षांपासून यात्रेनिमित्त सुरू करण्यात आलेल्या लेझर शोला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
यंदाच्या या टूडी शो मधून श्री मल्लिकार्जुन व श्री सिद्धरामेश्वर यांची श्रीशैल भेटीचा प्रसंग “सोहळा गुरुभेटी’चा दाखविला जाणार आहे. यासाठी श्रीशैल येथील कमरीकोळ या दरीचे दृश्य दाखविण्यासाठी सुमारे 22 फूट उंचीची श्री. मल्लिकार्जुन व श्री सिद्धरामेश्वरांची मूर्ती तयार करण्यात आली आहे व ही मूर्ती क्रिएटिव्ह आर्ट स्टुडिओचे उमेश व्हरकट यांनी तयार केलेली आहे. या शोमध्ये श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म, श्री मल्लिकार्जुन यांच्या सगुण रूपाचे दर्शन घेण्यासाठी श्री सिद्धरामेश्वरांची श्रीशैल पदयात्रा, कमरीकोळळ येथून उडी टाकताना श्री सिद्धरामेश्वर व श्री मल्लिकार्जुन या गुरु-शिष्य भेटीचे दृश्य, मल्लिकार्जुन व श्री सिद्धरामेश्वर यांची षोडशोपचार पूजा, यानंतर श्री सिद्धरामेश्वर वचन गायन, श्री सिद्धरामेश्वर आधारित भक्तीगीते, तदनंतर सिद्धरामेश्वरांनी सोन्नलगीला परतल्यानंतर केलेले धार्मिक, सामाजिक व अध्यात्मिक कार्य यामुळे सोन्नलगीचे अभिनव श्रीशैलमध्ये झालेले रूपांतर, सिद्धरामेश्वरांची शिवयोगसमाधी व शेवटी श्री सिद्धरामेश्वरांची आरती या क्रमाने कार्यक्रमाचे स्वरूप आहे
कार्यक्रम बुधवारी रात्री आठ वाजता प्रारंभ होईल.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील नामांकित संस्था आतिषबाजी सादर करणार आहेत. यावर्षी बेंगलोर येथील नामांकित कंपनीस टु. डी. शो करण्यासाठी देवस्थानच्या समितीने निमंत्रित केले आहे. यंदाचा टू.डी.शो भाविकांना आगळावेळा अनुभव देऊन जाईल असा विश्वास श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला आहे. तरी सर्व सिद्धेश्वर भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.