काँग्रेस पक्षातील १०० नेत्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं होतं, असा दावा काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी केला आहे. पक्ष विरोधी कारवाया व पक्ष शिस्तभंगांची कारवाई करत काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून झा यांना १४ जुलै रोजी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर झा यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारचे मोठं वक्तव्य केलं आहे. नेतृत्वासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी नेत्यांनी केल्याचा दावाही झा यांनी केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १४ जुलै रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याने तसेच पक्षाची शिस्त मोडल्याने संजय झा यांना तत्काळ प्रभावाने पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले होते. पक्षामधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता झा यांनी पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपला मार्ग योग्य प्रकारे निवडला नाही तप पक्ष उद्धवस्त होईल असं म्हटलं होतं. एका लेखामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये विरोधी विचारांबद्दल असहिष्णुता आहे असं म्हटलं आहे. काँग्रेस भाजपावर ‘चुकीच्या पद्धतीने लोकशाही’ चालवण्याचा आरोप करते. तर दुसरीकडे स्वत:च्या पक्षामध्ये मात्र राजेशाही संस्कृतीला पाठिंबा देते असा टोलाही झा यांनी लगावला होता. याचबरोबर झा यांनी काँग्रेसच्या बिघडत्या परिस्थितीबद्दल पाच कारणंही सांगितली आहेत.