नवी दिल्ली : विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना तसंच काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सगळे युक्तिवाद एकाच बाजूचे होते. पुढील सुनावणी यूजीसीची बाजू येईल.
कोरोना संकटामुळे राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर यूजीसीने परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या. तरीही महाराष्ट्र सरकार सध्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे.