श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी
पंढरपूर, दि.04:- राज्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सहकुटुंब श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सदर कामांची पाहणी करुन, पुरातत्त्व विभाग व संबधित कंत्राटदारानी सदर कामास गती देऊन वेळेत व गुणवत्तापूर्ण करवीत अशा सूचना यावेळी दिल्या तसेच सुरु असलेल्या कामांना उपलब्ध निधीची माहिती घेवून, उपलब्ध निधीची कमतरता भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता शासनस्तरावरुन तात्काळ येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राज कुमार, उपविभागीय अधिकारी सचिन इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री खांडेकर, प्र.तहसीलदार सचिन मुळीक, कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंदीर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी दिली.