सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया अखेर दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू झालेली बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने प्रारुप मतदार यादी केल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राबिण्याचे आदेश पणन विभगाने दिले आहेत.
दरम्यान याबाबत सोलापूर व्हिजन न्युजने यापूर्वीच दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले होते. नवीन प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतरच बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असे संकेत दिले होते. अखेर हे वृत्त खरे ठरले आहे. सोलापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या आहेत. बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती अर्ज विक्री व स्वीकृतीचा पहिल्या दिवसानंतर ही प्रक्रिया करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२४ रोजी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवा अध्यादेश काढून या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, त्यामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी दि.०१.०६.२०२४ अखेरच्या दिनांकास धरुन केलेली असल्याने, सदर मतदार यादीस दि.०२.१२.२०२४ रोजी ०६ महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचा दि.०१ जानेवारी, २०२५ पासून आहे त्या टप्यावर सुरु होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करुन नव्याने प्रारुप मतदार यादी तयार करुन सुधारीत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे.
नव्याने मतदार यादी बनवण्याचे कामकाज सुरू करण्याचे आदेश…
कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीसाठी सहा महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन मतदार यादी केली जाते. जुन्या मतदार यादीतील मतदारांची नावे तपासली जातात. त्यानंतर सदरची नवीन प्रारूप मतदार यादी तयार केली जाते. कायद्याच्या नियमानुसार प्रारूप मतदार यादीस सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्याने, मतदार यादी बनवण्याचे कामकाज सुरू करण्याचे आदेश पणन विभागाने दिले आहेत.
मोहन निंबाळकर, पणन उपसंचालक तथा प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.