फेब्रुवारी 2025 मध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन होणार
सोलापूर, दि. 26- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय अंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभाग, मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि बोर्डाचे संचालक श्री पी. एन. जुमले यांच्या पुढाकाराने या करारावर बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक श्री एन. एन. वडोदे व विद्यापीठातर्फे कुलसचिव श्रीमती योगिनी घारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभागाच्या पुढाकाराने हा करार झाला. यावेळी प्लेसमेंट विभागाचे संचालक डॉ. अनिल घनवट, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, डॉ. विनायक धुळप, डॉ. आर. एस. मेंते, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ऍड. जावेद खैरदी आदी उपस्थित होते. एप्रेटीसशिप एबेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) कोर्सेस नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (एनएटीएस) मध्ये समावेश करून या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना एप्रेटीसशिप ट्रेनिंगच्या संधी विद्यावेतनासह उपलब्ध करण्यासाठी सामंजस्य करार झाला.
यावेळी कुलगुरू प्रा. महानवर बोलताना म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पस आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले उच्च शिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या दृष्टीने विविध उपक्रम विद्यापीठ सतत राबवित आहे. त्याच अनुषंगाने शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंगशी उपरोक्त करार झाला. या माध्यमातून फेब्रुवारी 2025 मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभागाचे उपसंचालक श्री एन. एन. वडोदे म्हणाले, पूर्वी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच एप्रेटीसशिप प्रशिक्षण मिळायचे. आता मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार भारत सरकार द्वारा सर्व पदवीधर व डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (एनएटीएस) अंतर्गत एप्रेटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान एप्रेटीसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन दिले जाते. विद्यावेतनाचा किमान दर 8 हजार रुपये प्रति महिना इतका आहे. या विद्या वेतनातील 50 टक्के भाग भारत सरकारद्वारा एप्रेटीसना डीबीटी द्वारा सरळ त्यांच्या खात्यात जमा केला जातो. सोलापुरातील विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ मिळावा म्हणून हा करार केल्याचे वडोदे यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय अंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभाग, मुंबई सामंजस्य करार झाला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, बोर्ड ऑफ अप्रेंटशीप ट्रेनिंगचे एन. एन. वडोदे, डॉ. अनिल घनवट व अन्य.