मोहोळ: नजीक पिंपरी, ता. मोहोळ येथे दि. २०/०४/२०२० रोजी अमोगसिध्द सरवदे याचेवर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सत्यवान तात्या सरवदे, सचिन अंकुश सरवदे,अभिमान तात्या सरवदे, सर्व रा. नजीक पिंपरी, ता. मोहोळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भारती डांगरे यांच्या समोर होऊन न्यायमुर्तींनी तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणाची हकीकत अशी की, दिनांक २०/०४/२०२० रोजी फिर्यादी सुधाकर सरवदे हे त्यांचे घरासमोर चालु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेले असताना भांडण सोडविण्यासाठी का आला म्हणुन आरोपींनी व त्यांच्या साथीदारांनी सुधाकर सरवदे, अमोगसिध्द सरवदे व आनंद सरवदे यांना काठी,तलवार, सळई या हत्यारांनी प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. आरोपी सत्यवान सरवदे, सचिन सरवदे व अभिमान सरवदे यांचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता. या आदेशाविरुध्द आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांचेमार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी ॲड. जयदीप माने यांनी न्यायमुर्तींच्या निदर्शनास आणून दिले की, केवळ संशयावरुन आरोपींना याप्रकरणी खोटेपणाने गुंतविण्यात आले आहे. सदर प्रकरणातील युक्तिवाद हा व्हिडीओ कॉन्फर्रन्सद्ववारे करण्यात आला.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने , ॲड. विकास मोटे यांनी तर सरकारतर्फ ॲड. एस.एच. यादव यांनी काम पाहीले.