या दिवशी होणार समायोजन
मा.शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली माहिती
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी २०२३-२४ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यादीमधील शिक्षकांनी हरकती नोंदविण्यासाठी ४ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय जिल्हा परिषद, सोलापूर येथे हरकती सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षक हे मराठी माध्यमाचे असून, समायोजन झाल्यानंतर पदस्थापना मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. याबाबतची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्यांना पत्रान्वये देण्यात आली आहे. या यादीत समायोजन न झालेल्या शिक्षकांचीही नावे आहेत. सोलापूर शहराबरोबरच सांगोला, माळशिरस, माढा, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट आदी तालुक्यांतील शिक्षकांचा समावेश आहे. हरकती, सुनावणी झाल्यानंतर तत्काळ पदस्थापना देण्यात येणार असून, रिक्त असलेल्या शाळांना शिक्षक मिळणार आहेत. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे.
हरकतींवर १० डिसेंबरला सुनावणी…
अतिरिक्त शिक्षकांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ही मुदत ९ डिसेंबरपर्यंत असून, आलेल्या हरकतींवर १० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुनावणी घेऊन आक्षेपांचे निराकारण करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.