मुंबई: राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असले तर गृहमंत्रीपद आमच्याकडे असावे, हा नैसर्गिक नियम आहे. ते खातं आमच्याकडे असायला हरकत नाही. गृहखात्यावर एखादा डॅशिंग नेता असायला पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे हे गृहखाते शिवसेनेला मिळण्याबाबत अजूनही ठाम असल्याचे संकेत मिळत आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे सगळ्या राजकीय घडामोडींपासून अलिप्त होत साताऱ्यातील आपल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे महायुतीच्या खातेवाटपाची बैठक लांबवणीवर पडली आहे. अशातच आता संजय शिरसाट यांनी शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क असल्याचा दावा केला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय शिरसाट यांनी अर्थखात्याबाबतही टिप्पणी केली. जे देतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. लाडकी बहीण योजना जाहीर करताना अर्थ खात्याने थोडा विरोध केला होता. 1500 ते 2100 करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मान्यता मिळाली हवी. या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.