अक्कलकोट :आईला का घेऊन गेला, याची विचारणा करणाऱ्या मर्चंट नेव्हीमधील अधिकाऱ्यावर सख्या मामांसह आजी, मावशी, मामाची मुले व इतर अशा सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून, कुऱ्हाड, काठी, लोखंडी रॉड व दगडाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना 22 जुलै रोजी हालहळळी अ (ता. अक्कलकोट) येथे घडली. या प्रकाराला 13 दिवस झाले तरीही आरोपी अद्याप मोकाट आहेत. मुख्य मारेकरी हा हालहळळीचा माजी सरपंच असून, त्याच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हल्ल्यात जखमी झालेल्या मर्चंट नेव्हीमधील अधिकारी नागनाथ परमेश्वर हुक्केरी (वय 33) यांच्यावर सोलापुरात उपचार सुरु आहे. नागनाथ हुक्केरी यांची आई मनोरुग्ण असून, तिला भागेश बिराजदार याने तिच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन कुठे तरी नेला होता. याची माहिती मिळताच नागनाथ यांनी खंडेश बिराजदारला विचारणा केली असता, तेथे माजी सरपंच नीलप्पा बिराजदार याने आई, बहिण, मुले व इतर साथीदारांचा बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करीत व `तुला जीवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत कुऱ्हाड, लोखंडी रॉड व दगडाने प्राणघातक हल्ला केला. यात ते बेशुद्ध पडले. दरम्यान जखमी नागनाथची पत्नी सुनीता हुक्केरी व शंकर गजधाने यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करुन दमदाटी करण्यात आली. जखमीला उपचारासाठी नेणाऱ्यांना बघून घेण्याची धमकी दिली. या घटनेत जखमीच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चैन, एक मोबाईल गहाळ झाला आहे. घटनेनंतर एपीआय विलास नाळे यांच्यासह पोलिसांनी दवाखान्यात येऊन जखमीचा जबाब घेतला. दुसऱ्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा केला.
या प्रकरणी हालहळळीचा माजी सरपंच निलप्पा बिराजदार, खंडेशा बिराजदार, भागेश बिराजदार, भौरम्मा बिराजदार, रत्नाबाई बिराजदार, मल्लिनाथ बिराजदार, गुरुनाथ बिराजदार (सर्व रा. हालहळळी अ, ता. अक्कलकोट) यांच्यावर उत्तर पोलीस ठाण्यात भादवि कलम 307, 143, 147, 148, 149, 452, 504 यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी करीत आहेत.