सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना बूस्टर डोस देण्यासाठी पक्षश्रेष्ठी, दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री, ग्राउंड लेव्हलवर उतरलेले दिसत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप पक्षाचे उमेदवार सुभाष दशमुख यांनी भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी सोलापुरात आल्यानंतर विरोधकांवर टीका करताना, त्यांना आरसा दाखवला.
दरम्यान नितीन गडकरी जाहीर सभेत म्हणाले की, काँग्रेसनेच संविधानाशी छेडछाड केली आहे. ते विनाकारण भाजपवर खोटा आरोप करून लोकांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षाचा संविधान बचावाचा नारा म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असल्याची टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजपाचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंड येथे आयोजित सभेत गडकरी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख यांच्यासह कर्नाटकचे खासदार इराण्णा कडादी, सोलापूरचे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, प्रदेश भाजप सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राजाभाऊ सरवदे, किशोर देशपांडे, रोहिणी तडवळकर, संतोष पवार अमोल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे झाली आहेत. तेव्हापासून ६५ वर्षे राज्यात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसने ग्रामीण भागात कधीही लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात आजही रस्ते, दवाखाने, शिक्षण सुविधा उपलब्ध नाहीत. त्यावेळी जर काँग्रेसने या सुविधा केल्या असत्या तर आज आपण मागासलेलो राहिलो नसतो. या उलट भाजपाने सत्ता आल्यापासून सबका साथ सबका विकास हे ध्येय अवलंबले आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना सुरू केली. जवळपास साडेतीन लाख गावांमध्ये रस्ते पोहोचलेले आहेत. गेल्या दहा वर्षात ६७ कल्याणकारी योजना केंद्र आणि राज्य सरकारने राबवल्या आहेत. या योजना राबवताना कधीही भाजपाने जातीभेद केला नाही. या उलट काँग्रेसनेच समाजामध्ये जातीभेदाचे बीज रोवले आहे. त्यामुळे आता त्यांचा संविधान बचावचा नारा म्हणजे चोराच्या उलटा बोंबा आहेत.
दक्षिण तालुका विधानसभा मतदारसंघात पाच हजार तीनशे कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. त्यामध्ये काही कामे झाली आहेत तर काही कामे पूर्णत्वाच्या मार्गामध्ये आहे. यामध्ये सुरत चेन्नई रस्ता, आसरा उड्डाणपूल याशिवाय दोन मोठ्या उड्डाण पुलाचा समावेश आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी सुचवलेल्या लॉजिस्टिक पार्कला ही निवडणुका संपल्यानंतर मी मंजुरी देणार आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात केवळ ३६१ किलोमीटरचा राज्य महामार्ग होता आपण मंत्री झाल्यापासून जिल्ह्यात ९३७ किलोमीटरचा नव्याने राज्य महामार्ग झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रापर्यंत आपण मजबूत आणि दर्जेदार रस्ते करू शकलो हे माझे भाग्यच आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून जाणारा पालखी महामार्गाचाही समावेश आहे. सध्या देशात नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे याचाच आधार घेऊन आपण नागपूरमध्ये पायलट बस म्हणजे हवेत उडणारी बस सुरू करणार आहोत. नागपूर मध्ये हा प्रकल्प झाल्यावर लागलीस दुसरा प्रकल्प आपण सोलापुरात आणणार असल्याचेही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, नितीन गडकरी यांचे दक्षिण तालुक्यावर खास प्रेम आहे. ते ज्या ज्या वेळेस दक्षिण तालुक्यात आले आहेत त्यावेळेस त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. आतापर्यंत त्यांनी हजारो कोटींचा निधी दक्षिण तालुक्याला दिला आहे. यामध्ये केगाव- हतुर बायपास रोड, मोहोळ कुरूळ कामती हा राष्ट्रीय महामार्ग, आसरा उड्डाणपूल यासह अनेक कामांना त्यांनी निधी दिला आहे. आपल्याला अजूनही त्यांच्याकडून भरपूर घ्यायचे आहे. त्यासाठी मला तिसऱ्यांदा पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आता मतदानाला केवळ चार दिवस राहिले आहेत हे चार दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या, मी पुढील पाच वर्षे तुमच्यासाठी सेवक म्हणून कार्यरत राहीन.
यावेळी कर्नाटकचे खासदार कडादी, सोलापूरचे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, रघुनाथ कुलकर्णी, अमोल शिंदे, संतोष पवार, जितेंद्र पवार यांनी आपल्या मनोगततून आमदार सुभाष देशमुख यांना पाठबळ देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी केले.