सोलापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व 3 हजार 738 मतदान केंद्रावर वीज कनेक्शन उपलब्ध करून त्या ठिकाणी चांगली प्रकाश व्यवस्था आहे याची खात्री प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या अंतर्गत क्षेत्रिय अधिकाऱ्यामार्फत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व नोडल अधिकारी व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकांसे, सीव्हीजील चे नोडल अधिकारी आशिष लोकरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी, तहसीलदार सरस्वती पाटील तर अन्य नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रकाशाची व्यवस्था चांगली राहील याची खात्री करावी प्रत्येक मतदान केंद्रावर आत मध्ये एक व बाहेर एक प्लग केलेला आहे परंतु मतदान केंद्राच्या आत मध्ये प्रकाश चांगला राहील याची दक्षता घेण्यात यावी. आपल्या अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व सेक्टर ऑफिसर यांना याबाबत खात्री करण्यास सूचित करावे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प ची व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु काही ठिकाणी रॅम्प व्यवस्थित करून घ्यावेत अथवा तात्पुरते बसवावेत असेही त्यांनी सुचित केले.
सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करून दिनांक 20 नोव्हेंबर रोजीची मतदानाची प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडेल यासाठी प्रयत्न करावेत. स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमपणे पुढील दोन-तीन दिवस राबवावेत. तसेच सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.