देवेंद्र कोठे यांचे आश्वासन : श्री कुरूहिनशेट्टी समाजाचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा
सोलापूर : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. विधानसभेत गेल्यानंतर यंत्रमाग कामगार महामंडळाची स्थापना करून व्यवसाय, उद्योगासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दिली. श्री कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेतर्फे आयोजित श्री कुरुहिनशेट्टी समाज मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात समाजातर्फे जाहीर पाठिंबाचे पत्र देवेंद्र कोठे यांना देण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए ) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, संस्थेचे प्रेसिडेंट प्रा. नारायण संगा, उपाध्यक्ष ॲड. सिद्धेश्वर बुगडे, सचिव संजय बुगडे, खजिनदार श्रीनिवास जोगी, सहसचिव श्रीनिवास गडगी, शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर गोरंटी उपस्थित होते.
देवेंद्र कोठे म्हणाले, श्री कुरुहिनशेट्टी समाज सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे. या समाजासाठी राज्य शासनाकडून सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रयत्न करू. हातमाग, वस्त्रोद्योग, यंत्रमाग, टेक्स्टाईल क्षेत्रातील कामगार आणि उद्योजकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करू. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्यात येतील. चांगल्या योजना राबवणाऱ्यांच्या पाठीशी मतदारबांधवांनी रहावे, असे आवाहनही देवेंद्र कोठे यांनी यावेळी केले. या मेळाव्यास श्री कुरूहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी, विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.