गुरुदेव रानडे यांच्या अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन संस्थेच्या वतीने आयोजन
सोलापूर दि. ११ : प. पू. डॉ. गुरुदेव रा. द. रानडे ह्यांनी १९२४ मध्ये स्थापन केलेल्या बेळगाव (कर्नाटक) येथील अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन अर्थात ए.सी.पी.आर या संस्थेचे शतकमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त संस्थेच्या वतीने सोलापूरात ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांच्या तीन दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर व शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता तसेच रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रवचन होईल.
प. पू. गुरुदेव रानडे हे तत्त्वज्ञानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लेखक आणि व्याख्याते होते. अनेक वर्षे पुणे व सांगली येथे प्राध्यापक म्हणून सेवा करून ते अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवृत्त झाले. निंबर्गी संप्रदायाचे भाऊसाहेब उमदीकर ह्यांचे शिष्य म्हणून त्यांनी मोठी आध्यात्मिक प्रगती साधली होती. सोलापूरजवळील कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे बांधलेल्या आश्रमात त्यांचे वास्तव्य होते. एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ आणि निष्ठावान गुरुभक्त म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर ”ऐसे जे महानुभाव | जे दैविये प्रकृतीचे दैव” ह्या ज्ञानेश्वरीतील ओवीच्या आधारे करतील. गेल्या तेरा वर्षांपासून चैतन्यमहाराज देगलूरकर यांची ज्ञानेश्वरीतील विविध विषयांवरील प्रवचने सोलापूरात आयोजित करण्यात येत आहेत.
बेळगाव येथील ए.सी.पी.आर. ही संस्था तत्त्वज्ञान विषयक ग्रंथांचा आणि प. पू. गुरुदेव रानडे यांच्या अध्यात्मिक पातळीवर समाजउन्नतीच्या कार्याच्या प्रसारासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या वाचनालयात पंचवीस हजारांहून अधिक इंग्रजी, मराठी, कानडी, संस्कृत भाषांतील ग्रंथ उपलब्ध असून संशोधनपर चर्चासत्रे, व्याख्याने, शिबिरे असे विविध उपक्रम राबविले जातात. बेळगाव येथे संस्थेच्या शतक महोत्सवाची सुरुवात नुकतीच झाली असून त्यानिमित्त येत्या वर्षभरात देशभरातील विविध शहरात व्याख्याने, शिबिरे घेण्याचा संस्थेचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून सोलपूरातील या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
प. पू. गुरुदेव रानडे यांच्या आदर्श व उच्चतम सिद्ध जीवनाचे दर्शन चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या प्रगल्भ वाणीतून घडणार आहे. तरी सोलापूरकरांनी तीनही दिवस प्रवचनास उपस्थित राहावे, असे आवाहन ए.सी.पी.आर. संस्थेचे सचिव ॲड. मारुती झिरली व सोलापूरातील विश्वस्त प्रा. डॉ. अश्विनी जोग यांनी केले आहे.