राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट हा वाद आता राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे सरकला आहे. सोमवारपासून विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. त्याला राज्यपालांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत सर्व आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले असून, काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शनं सुरू केली आहेत.
सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना दिलेल्या अपात्रता नोटीसीवर राजस्थान उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे काँग्रेसचं लक्ष होतं. मात्र, उच्च न्यायालयानं नोटीसीवर स्थगिती आणल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बहुमत चाचणीसाठी पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्याचबरोबर फोनवरून संवाद साधत गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे सोमवारपासून अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
“उद्या राज्यातील जनतेने राजभवनाला घेराव घातला, तर आमची जबाबदारी नाही,” असा इशाराही गेहलोत यांनी दिला होता. काँग्रेसच्या मागणीनंतर राज्यपालांनी अधिवेशन बोलण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शनं सुरू केली आहेत. बहुमत चाचणी घेण्यासाठी सोमवारपासून अधिवेशन बोलवावं अशी मागणी आमदारांनी केली आहे.