आनंदराव पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा
बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील आनंदराव पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. जवळपास पंधरा वर्षानी इतिहासाचा तास शिक्षक शहाजी भोसले यांनी घेतला. यावेळी शिक्षक भोसले यांनी इतिहास शिकवताना जीवन जगण्याची मूल्य देखील आधोरेखित केली. २००४-०५ मध्ये पाचवीमध्ये प्रवेश घेतलेले व २००८-०९ मध्ये शिकूण प्रशालेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्याचा हा स्नेहमेळावा सोमवार (ता.४) नोव्हेंबर’ला घेण्यात आला.
राष्ट्रगीताने मेळाव्याची सुरवात करण्यात आली. वर्गात हजेरी घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, सरस्वती’च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी विद्यार्थ्याच्या हस्ते आजी- माजी शिक्षकांचा शाल, पूस्तक,गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करताना, शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी योग्य मार्ग दाखवल्याने प्रशालेचे अनेक विद्यार्थी चांगली कामगिरी करत आहेत, याबद्दल सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यानी आभार मानले. जेवणाच्या सुट्टीनंत्तर माजी विद्यार्थ्याच्या धावणे, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यध्यापक विजयकुमार कुलकर्णी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले, ” प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये खूप चांगली प्रगती करावी अशी भावना सर्व शिक्षकांची असते. माजी विद्यार्थ्यानी शिक्षक व प्रशालेबद्दल प्रेम दाखवले हे असेच कायम राहू द्यावे.” असे सांगून सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत अशीर्वाद दिले. दिवसभर उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी दिवंगत माजी विद्यार्थिनीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पवार, रेणूका होनराव यांनी केले. आभार पांडुरंग परिट यांनी मानले. कार्यक्रमास आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.