शहर मध्यचा आमदार यंदा भाजप महायुतीचा
सोलापूर : भारतीय जनता पार्टी महायुतीला सोलापुरात मतदार बंधू-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहर मध्य विधानसभेचा आमदार यंदा भाजपा महायुतीचाच असेल असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी उपलप मंगल कार्यालयात शहर मध्य विधानसभा युवा मोर्चावतीने निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, वृषाली चालुक्य, अक्षय अंजिखाने, अनिकेत हारपुडे, सागर कोटला, विश्वनाथ प्याटी, रोहन मराठे, गणेश साखरे, विजय कुलथे, शिवा कावडे, सुनील साळुंखे, बसवराज गंदगे, शिवा कामाठी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मध्य पूर्व व पश्चिम मंडलाची कार्यकारिणी घोषित करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. युवा नेते व वडार समाजाचे युवक अध्यक्ष सुनील साळुंखे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत देवेंद्र कोठे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प जाहीर केला.
मोरे म्हणाले, युवा मोर्चाच्यावतीने राज्यभरात प्रवास करताना अनेक मेळावे केले. मात्र शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जो मेळावा होत आहे या मेळाव्यातील युवकांची गर्दी व उत्साह पाहता देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित असून फक्त लीड किती याचीच आतुरता आम्हाला लागली आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या मताधिक्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. मोरे याप्रसंगी म्हणाले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्ती देऊन याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मंडलाच्या कार्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांना दिली. तसेच मंडलात आगामी कार्यक्रमाच्या माध्यमातून नवमतदारांपर्यंत पोहचून महायुती सरकारने केलेली कामे सांगणार असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्र कोठे यांना आमदार करण्यासाठी तत्पर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला मध्य विधानसभा जागा देऊन जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवू असेही अंजिखाने याप्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाचे आभार युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी व रोहन मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार होमकर, अनिल अंजनालकर, अनिल वंगारी, उदयराज गुल्लापल्ली यांच्या शहर मध्य विधानसभेतील युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.