सोलापूर : विष्णुपंत तात्या कोठे यांनी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना घडवले आहे. भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची उमेदवारी म्हणजे तात्या कोठे यांच्या अनेकांवर असलेल्या ऋणातून उतराई होण्याची संधी आहे. त्यामुळे शहर मध्य मधून शिवसेनेकडून भाजपा व महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना मोठे मताधिक्य देणार असल्याचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा आणि माहितीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांची निवासस्थानी भेट घेतली.
याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे म्हणाले, भाजपा व महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे हे आमचे कौटुंबिक सदस्य आहेत. कोठे परिवाराशी आमचे गेल्या अनेक दशकांपासूनचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे आम्हाला आनंद झाला. ते तरुण, आश्वासक, विकासाभिमुख आणि जनताभिमुख उमेदवार आहेत. ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शहराचा विकास निश्चित आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना सक्रियपणे भक्कम पाठिंबा देणार आहे, असे अभिवचनही माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दिले.
देवेंद्र कोठे यांना विकासाची जाण आहे. समाजकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देवेंद्र कोठे यांना सोलापूरकरांनी निवडून देणे आवश्यक आहे, असेही माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी याप्रसंगी सांगितले.
उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याकडून मला कायमच सामाजिक आणि राजकीय मार्गदर्शन मिळते. त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे शहर मध्य विधानसभा निवडणुकीच्या या लढाईला आणखी बळ मिळाले आहे.
याप्रसंगी माजी नगरसेविका मंगला कोल्हे, रणजीत कोल्हे, हर्ष कोल्हे, विराज कोल्हे, अतिश चव्हाण, मंगेश डोंगरे, आकाश जाधव, सतीश मस्के, आरिफ निगेबान आदी पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.