मुंबई : राज्यातील विधानसभा निडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलं असून एमेकांवर टीका-टिपण्णी व राजकीय बॉम्ब फोडले जात आहेत. त्यातच, आता बड्या नेत्यांच्या सभांचीही तारीख व वेळ निश्चित केली जात आहे. शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून आपल्या राजकीय प्रचार दौऱ्याला सुरुवात करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांची पहिली निवडणूक प्रचारसभा होईल. त्यानंतर, राज्यभरात त्यांच्या 15 सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील पहिल्या सभेची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून विधानसभा निवडणुकांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी नरेंद्र मोदी ८नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत.
राज्यात 8 तारखेला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकंच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राला 2 सभा दिल्या आहेत. त्यापैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल, मोदींच्या या दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक होतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. नाशिकच्या ग्राउंडला तर मोदी ग्राउंड नाव दिले आहे, येथे लाखोंची सभा होईल, असेही महाजन यांनी सांगितले.
चार दिवसात मोदींच्या 9 सभा होणार
नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.