सोलापूर, दि.21: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून जिल्ह्यात सुमारे 79 लाख 70 हजार 80 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त मास्क न वापरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत, यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. ६ ते २१ जुलै 2020 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकी वरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी 37289 प्रकरणात 60 लाख 37 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 10136 प्रकरणात 14 लाख 86 हजार 800 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3293 प्रकरणात 4 लाख 45 हजार 680 रुपयांचा दंड वसूल केला.
दरम्यान, आज शहरात ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालाकडून वाहने तपासणी सुरु होती.