पुणे – शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार मात्र सूरज मांढरे यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.
शिक्षण आयुक्तपदाचा सूरज मांढरे यांचा अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. मांढरे यांनी या कालावधीत शालेय शिक्षण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याला सतत प्राधान्य दिले आहे. कामचुकार व भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांना वठणिवर आणण्यासाठी प्रयत्न केले. भ्रष्ट कारभाराबाबत तक्रारी असलेल्या राज्यातील सुमारे ४० अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्याची मुभा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. यामुळे काही लाचखाऊ अधिकारी गोत्यातही सापडले.
मांढरे यांनी पवित्र पोर्टल मार्फत पारदर्शकपणे शिक्षक भरतीला प्राधान्य दिले. राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईचा धडाकाही लावण्यात आला. शाळांच्या गुणवत्ता सुधारावी व पायाभुत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी उत्तम उपक्रमाची आखणी करुन त्याची अंमलबजावणीही केली. अधिकारी यांना शाळा भेटीची सवयही लावण्यात आली.
शिक्षण विभागातील कामे जलद गतीने मार्गी लागावीत यासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणीही करण्यात आली. आवक-जावक प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी संगणक प्रणालीचा अवलंब करण्याबाबत मांढरे यांनी सतत आग्रह धरला आहे. शैक्षणिक दिनदर्शिकाही काढण्यात आली. अधिकारी यांना दैनंदिन कामकाजाच्या नोंदी करण्यासाठी डायरी लिहिण्याची सवयही अधिकारी यांना लावण्यात आली. अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या, पदोन्नत्यांनाही प्राधान्य दिले. मांढरे यांना डिसेंबर २०२५ मध्ये सचिव पदी पदोन्नतीही मिळणार आहे.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सोमवारी (दि.१४) जारी केले आहेत. त्यांना नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा लागणार आहे. पुढील आदेश होई पर्यंत शिक्षण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही धारण करावा, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.