नेत्रदीपक लाडक्या बहिण सोहळ्याचे यश हे नेटक्या नियोजनाला…
“राज्य शासनाने 1 जुलै 2024 पासून राज्यातील 18 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर देण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 10 लाख 70 हजार महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून आज रोजी पर्यंत 7 लाख पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर 481 कोटी रुपये वितरित झालेले आहेत. त्या अनुषंगाने या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या सोहळ्यास संपूर्ण जिल्ह्यातून 40 हजार पेक्षा अधिक महिला लाभार्थी उपस्थित होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थी येऊन हा सोहळा भव्य दिव्य तर झालाच परंतु या सोहळ्यात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या होत्या. तसेच अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून लाभार्थ्यांना सोहळ्यात येण्यापासून ते जाण्यापर्यंत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही.
प्रशासनाने सोहळा ठिकाण ते सर्व लाभार्थ्यांना सुविधा देण्याचे काटेकोरपणे नियोजन केलेले होते. परंतु तीन ते चार वेळेस हा सोहळा रद्द झाला, तो दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद फडणवीस व मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. याची पहिली तारीख आल्यापासून ते सोहळा संपेपर्यंत जिल्हा प्रशासनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठीचा उत्साह अजिबात कमी नव्हता.
त्यामुळे हा सोहळा भव्य दिव्य असा झाला असून यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कुशल नेतृत्व तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे सहकार्य ही तेवढेच मौलिक ठरले.”
कार्यक्रमासाठी योग्य स्थळ-
मुख्यमंत्री कार्यालयातून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय यंत्रणेची बैठक झाली या बैठकीमध्ये या कार्यक्रमासाठी स्थळ निवड करण्यात आली. 40 ते 50 हजार लाभार्थी बसू शकतील अशी व्यवस्था करणे तसेच त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था ही कार्यक्रम ठिकाणापासून साधारणत: एक किलोमीटरच्या अंतरात असावी या अनुषंगाने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील ‘होम मैदान’ निश्चित करण्यात आले.
कार्यक्रम व्यवस्था-
या सोहळ्यासाठी होम मैदान ही जागा निश्चित झाल्या नंतर त्या ठिकाणी चाळीस हजार महिला लाभार्थी व्यवस्थितपणे बसू शकतील यासाठी भव्य दिव्य असा वॉटरप्रूफ मंडप टाकण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली. या मंडपात 40 हजार खुर्च्या टाकण्यात आल्या त्या प्रत्येक खुर्चीवर लाभार्थ्यांना पिण्यासाठी पाणी बॉटल देण्यात आली. तसेच मंडपाच्या बाजूलाही हजारोच्या संख्येने जागोजागी पाण्याचे जार ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. मंडपाच्या तिन्ही बाजूंना सोलापूर महापालिका जिल्ह्यातील विविध नगरपालिका यांच्याकडे असलेले मोबाईल टॉयलेट असे एकूण 450 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली. तसेच हे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले.
सूक्ष्म नियोजनासाठी 9 बैठका-
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे अत्यंत बारकाईने लक्ष होते. कार्यक्रमाची पहिली तारीख जाहीर झाल्यापासून ते दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी चा प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंत च्या कालावधीत जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी 9 बैठका घेतल्या होत्या, त्यामध्ये 6 बैठका दूरदृश्य प्रणाली द्वारे तर 3 बैठका प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या होत्या. या सर्व बैठकातून या कार्यक्रमाची अत्यंत बारकाईने रूपरेषा ठरविण्यात आली तसेच प्रत्येक विभागाला पहिल्याच बैठकीत दिलेली जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतात का नाही यावर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार ह्या अत्यंत सूक्ष्मपणे लक्ष ठेवून होत्या.
एस. टी. महामंडळाच्या 438 बसेसची व्यवस्था – सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यातून एसटी महामंडळाच्या 438 बसेस मधून जवळपास 20 हजार पेक्षा अधिक महिला लाभार्थी आणण्याचे नियोजन करण्यात आले. नवरात्र महोत्सवात एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या असतानाही सोलापूर विभागाने त्यांच्या स्तरावरून या कार्यक्रमासाठी 438 बस उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या प्रवाशांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या दृष्टीने त्यांनी नियोजन केले.
बसेस मधील सुविधा-
प्रत्येक तालुक्याच्या गावागावांमधून योजनेच्या लाभ मिळालेले लाभार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारा असल्याने त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती संबंधित तालुक्याचे तहसीलदार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. प्रत्येक बस मध्ये लाभार्थ्यांना फूड पॅकेट स्नॅक्स पाणी बॉटल उत्कृष्ट क्वालिटीचे जेवण आधी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल होत्या. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना निर्देशित केले होते.
प्रत्येक बस मध्ये अंगणवाडी सेविका अशा वर्कर तर बसचे नोडल अधिकारी म्हणून तलाठी किंवा ग्रामसेवक यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर सर्व संबंधित नोडल अधिकारी यांनी त्यांना ज्या गावातून यायचे आहे त्या गावातून होम मैदान, पार्किंग ते परत त्या गावात असा स्वतः प्रवास करून खात्री केली. प्रत्येक तालुक्यातील बसेसचे नियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करून एक नोडल अधिकारी देण्यात आलेला होता त्याचप्रमाणे 11 तालुक्यातील नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष निर्माण करून सर्व तालुका स्तरीय नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवला जात होता. त्यामुळे सभा ठिकाणी सर्व महिला लाभार्थी कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी विराजमान झालेल्या होत्या. हेच जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाचे द्योतक आहे.
- गर्दी व वाहतूक व्यवस्थापन-
8 ऑक्टोबर 2024 रोजी संपूर्ण जिल्हाभरातून 438 बसेस 250 खाजगी चार चाकी एक हजार दुचाकी इतकी वाहने सोलापूर शहरात दाखल होणार होती. त्या अनुषंगाने गर्दी व वाहतुकीचे योग्य नियोजन पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त दिपाली काळे, वाहतूक उपायुक्त सुधीर खिरडकर यांनी अत्यंत चोखपणे केले. प्रत्येक तालुक्यातून येणारी वाहने होम मैदान पासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली. संबंधित वाहने होम मैदानाच्या जवळपास येऊन लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी सोडून पार्किंग स्थळावर निघून जात होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने सोलापूर शहरात वाहने व नागरिक दाखल होऊनही कुठेही गर्दी दिसून आली नाही तसेच वाहतुकीस कोठेही अडथळा निर्माण झाला नाही हे अत्यंत महत्त्वाचे आहे. व लाभार्थ्यांना घेऊन सोलापूर शहरात दाखल झालेली सर्व वाहने सायंकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघालेली होती.
त्याप्रमाणेच होम मैदान परिसरात तसेच सभामंडपात कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. तसेच कोठेही गर्दी होणार नाही यासाठी शहर पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीवर अत्यंत चोखपणे नियंत्रण ठेवले. तसेच यासाठी शेकडो पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
सुरक्षा पासेस-
या कार्यक्रमासाठी अत्यंत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली होती. या ठिकाणी पत्रकार कक्ष, व्यासपीठावरील पासेस पोलीस विभाग तर व्हीआयपी कक्ष, अन्य पदाधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांना सुरक्षा पासेस जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुरवण्यात आलेले होते. त्यामुळे सुरक्षेवर असलेले पोलीस कर्मचारी पासेसची कसून चौकशी करूनच संबंधितांना आत मध्ये प्रवेश देत होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांना व्हीआयपी पासेस जिल्हा माहिती कार्यालयाने वितरित केले.
महिला लाभार्थी-
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळालेल्या हजारो लाभार्थी तसेच व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या लाभार्थ्यांची निवड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे नेतृत्वाखाली महिला व बालविकास व ग्रामविकास विभागाने केली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनीही हा सोहळा यशस्वी पार पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली .तसेच सोलापूर महापालिकेच्या वतीने या कार्यक्रमासाठी दहा हजार महिला आणण्याचे नियोजन करण्यात आले होते, त्या अनुषंगाने त्या महिलांना फूड पॅकेट स्नॅक्स, पाणी बॉटल आदी सुविधाही जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या होत्या. महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त शितल उगले तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, महापालिका बचत गटाचे समन्वयक समीर मुलांनी यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रम व आरजेचा प्रश्न उत्तर कार्यक्रम-
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी विविध संस्कृती कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील विविध पारंपारिक गीताने सांस्कृतिक कार्यक्रमाची लज्जत वाढली. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आधारित प्रश्न येथे उपस्थित असलेल्या महिला लाभार्थ्यांना विचारण्यात आले. यामुळे कार्यक्रमात रंजकता आली व कार्यक्रम ठिकाणी सुरुवातीला लवकर आलेल्या महिला लाभार्थ्यांचे ही मनोरंजन झाले.
अन्य अधिकाऱ्यांची भूमिका-
उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्यावर व्यासपीठ व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती. राजशिष्टाचाराप्रमाणे व्यासपीठावर मान्यवर व्यक्तींच्या चेअर व्यवस्थित आहेत का नाही यापासून ते सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्याबाबतची जबाबदारी त्यांच्यावर होती. जिल्हा नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने जवळपास साडेचारशे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था सभामंडप परिसरात तसेच पार्किंगच्या ठिकाणी करण्यात आलेली होती. या व्यवस्थेवर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार यांनी योग्य नियंत्रण ठेवून ही व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू ठेवली होती. रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनीही या सोहळ्याचे व्यासपीठ सजावट करून घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. सभामंडपात येणारे सर्व लाभार्थी तसेच महत्त्वाचे अति महत्त्वाचे व्यक्तींचे जेवण तसेच पत्रकारांसाठी जेवणाची व्यवस्था सभामंडपातील प्रत्येक खुर्चीवर पाणी बॉटल व्यवस्था करण्याचे नियोजन अत्यंत चोखपणे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पार पाडले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याबरोबर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाखाली अत्यंत काटेकोरपणे पार पाडली.
दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सन्मान-
मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचे अत्यंत नेट नेटके नियोजन करून हा सोहळा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
माहे फेब्रुवारी 2024 मध्ये मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा त्यानंतर माहे एप्रिल ते जून 2024 या कालावधीत झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 तर एक जुलै ते 23 जुलै 2024 या कालावधीत झालेली आषाढी वारी आणि दिनांक ८ ऑक्टोबर 2024 रोजी चा लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा अशा मोठ्या चार कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून यशस्वी आयोजन केलेले आहे. या सर्व यशस्वी कार्यक्रमातून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे कुशल प्रशासकीय नेतृत्वगुण दिसून येत आहेत.
मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सभा परिसरात आगमन झाले. त्यानंतर रॅम वरून दोन्हीही खूप मुख्यमंत्री व्यासपीठाकडे येत असताना रॅम्पच्या दोन्हीही बाजूला बसलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःहून शेकडो राख्या बांधल्या. हे संपूर्ण व्यासपीठ सभामंडप अत्यंत नेत्रदीपक पद्धतीने सजवण्यात आलेले होते, तर 40 हजार पेक्षा अधिक महिला लाभार्थी उपस्थित राहिल्याने हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य तर झालाच परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाने व नेटक्या नियोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झालेला आहे. बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेऊन तो तेवढ्याच उत्कृष्टपणे पार पाडलेला आहे.