सोलापूर दिनांक 7:- जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी या 24 गावांना पाणी देण्याचा शब्द दिलेला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले.
आंधळवाडी तालुका मंगळवेढा येथे आयोजित
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत मंगळवेढा उपसा सिंचन योजना अंतर्गत पंपगृह टप्पा क्रमांक एक, उर्दूगामी नलिका क्रमांक एक, शेलेवाडी मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता डॉक्टर एच टी धुमाळ, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील 24 गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या गावातील दुष्काळी परिस्थिती संपण्याबरोबरच 17 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन केलेले आहे. शासनाने जलसंपदा विभागाच्या विविध योजना राबवून सोलापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती संपवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तसेच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास सातत्यपूर्ण वीजपुरवठा केला जात आहे विज बिल माफ करणारी व दिवसा सिटी पंपांना वीज पुरवठा करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही देशातील पहिली कंपनी आहे. सौर कृषी पंप अंतर्गत मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी पंप दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्य शासन लेक लाडकी योजना, एसटी बस मध्ये महिलांना सवलत, मुलींना उच्च शिक्षण मोफत, लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थ्याला दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय असे अनेक लोक कल्याणकारी निर्णय शासन घेत असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी देऊन आज जवळपास 32 कामांचे भूमिपूजन होत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रस्ताविकात एमआयडीसी रस्ते उपसा सिंचन योजना अधिक कामाचे भूमिपूजन होत असल्याने हा एक आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. यातून 24 गावाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विज बिल माफ योजनेअंतर्गत 48 हजार शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांची सवलत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास मतदारसंघातील हजारो नागरिक उपस्थित होते.