येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत मोदी मंत्रिमंडळाने देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. वन नेशन वन इलेक्शन कमिटीने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला होता.
देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना आता सोपी झाली आहे. एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. एनडीए सरकार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेत आणणार आहे. त्यानंतर येत्या काळात याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.