सोलापूर : खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने दर निश्चित केले आहेत. हे दर 2200, 2500 आणि 2800 रुपये, असे हे दर आहेत. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी शासन आदेश जारी केला आहे.
या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, स्वॅब घेतल्या जाणाऱ्या ठिकाणाहून सॅम्पल गोळा करणे, वाहतूक आणि अहवालाचे रिपोर्टींग करणे यासाठी 2200 रुपये आकारणी करावी. कोविड केअर कलेक्शन सेंटर, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वारंटाईन सेंटर येथून सॅम्पल गोळा करुन त्यासाठीच्या चाचणीसाठी 2500 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यासाठी 2800 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
खासगी प्रयोगशाळांनी अशा प्रकारे चाचणी करताना आयसीएमआर आणि भारत सरकार यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. खासगी प्रयोगशाळांनी या चाचण्यांतील माहिती लगेचच आयसीएमआरच्या बेवसाईटवर भरणे बंधनकारक आहे. अशी माहिती न भरल्यास संबंधित प्रयोगशाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते. रुग्णांच्या नावांबाबत गुप्तता पाळणे बंधनकारक आहे. चाचण्यांचा डाटा सांभाळून ठेवण्यात यावा. या आरटी-पीसीआर चाचण्यांचे दर प्रयोगशाळेच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. प्रयोगशाळांनी महापालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनीही सॅम्पल गोळा करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष देण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावा, असे या आदेशात नमूद केले आहे.