अजिंक्य हरिदास रणदिवे यांनी ३/९/२०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. अजिंक्य रणदिवे हे वयाच्या २२व्या वर्षी सन २०१६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्याधिकारी बनले आहेत. त्यांनी आजपर्यंत लातूर जिल्ह्यातील शिरूरअनंतपाळ, चाकूर व औसा नगरपालिकेत व नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे मुख्याधिकारी म्हणून सेवा केलेली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील संत शिरोमणी श्री सावता माळी महाराज यांचे जन्मस्थान व संजीवन समाधिस्थान म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या श्रीक्षेत्र अरणचे अजिंक्य रणदिवे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जन्मगाव अरण येथे तर महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर व फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे झाले आहे.
अजिंक्य रणदिवे राष्ट्रीय पदक विजेते धनुर्विद्या खेळाडू आहेत. त्यांनी तिरंदाजीमध्ये शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके पटकावली आहेत. वक्तृत्व स्पर्धांमध्येही त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविले आहेत.
मुख्याधिकारी म्हणून रुजू होताच नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी नगरपालिका सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसेच राजगुरूनगरमध्ये भीमा नदीच्या काठी असलेल्या थोर क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळ स्मारकाला भेट देऊन हुतात्मा राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले व स्मारकाची पाहणी केली.
यावेळेस त्यांचेसोबत वडील हरिदास रणदिवे , बहीण समृद्धी व नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.