येस न्युज नेटवर्क : टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारताच्या महिला संघाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे ऑक्टोबरमध्ये महिला T20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघात १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. याशिवाय ३ ट्रॅव्हलिंग रिजर्व आणि २ नॉन ट्रॅवलिंग रिजर्वदेखील निवडण्यात आले आहेत. फिरकीपटू श्रेयंका पाटीलची निवड झाली असली तरी तिच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे.
भारताचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असेल. तर स्मृती मानधना ही भारताची उपकर्णधार असेल. भारताच्या फलंदाजी बाजूची जबाबदारी सलामीवीर शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दयालन हेमलता यांच्यावर वरच्या फळीत असेल, तर सजना सजीवनलाही संघात संधी मिळाली आहे. फिरकी विभागाचे नेतृत्व अष्टपैलू दीप्ती शर्मा, फिरकीपटू राधा यादव आणि लेग-स्पिनर आशा शोभना यांच्याकडे असेल, जी ३३व्या वर्षी तिच्या पहिल्या विश्वचषकात खेळतील.