आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांना यश
सोलापूर : सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिर येथे आई रूपाभवानी भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणेस शासन आदेश झाला आहे. श्री रूपाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी नवरात्रीसह प्रत्येक पौर्णिमा, मंगळवारी, शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. परगावहून मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. अशा भाविकांच्या निवासाच्या सोईकरिता श्री रूपाभवानी मंदिर परिसरात यात्री निवास बांधावे, अशी मागणी भाविकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे श्री रूपाभवानी मंदिर यात्री निवास बांधकामाकरिता निधीची मागणी केली होती. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने यात्री निवास करिता पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास प्रारंभ होणार आहे, असे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर शहर हे अनेक तीर्थक्षेत्राना जोडणारे शहर असून परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी श्री रूपाभवानी यात्री निवास सोयीस्कर ठरेल.