नवकल्पना व उद्योगास मिळणार प्रोत्साहनपर बक्षिसे!
सोलापूर, दि. 22- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटर यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या शुक्रवार, दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पार पडणार आहे. यामध्ये विजेत्या नवकल्पना व उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसे दिली जाणार आहेत.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या पारितोषिक वितरण समारंभास प्रिसिजन कॅमशॉफ्टचे चेअरमन यतीन शहा यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, सविष्कार इंडियाचे देवदत्त जोशी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अमित जैन, इनक्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक डॉ. विकास पाटील, उद्यम फाउंडेशन इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुरानी, सविष्कार इंडियाच्या दीक्षा यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन सविष्कार इंडिया, स्वावलंबी भारत अभियान, आय हब गुजरात, आयएसबीए आणि एमएसआयएनएस यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन टप्यांत पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामधील नवउद्योजकांकडून कल्पना व उद्योगाविषयी सविस्तर माहिती मागवून घेण्यात आली. यामध्ये एकूण 284 जणांनी सहभाग घेतला. 25 राज्यातील नवउद्योजकांचा यामध्ये समावेश होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राप्त अर्जांची व कल्पनांची छाननी होऊन समितीने एकूण 104 नवउद्योजकांची निवड केली.
आता यातील विजेत्या विद्यार्थ्यांची निवड व अंतिम स्पर्धा उद्या शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. यावेळी विजेता विद्यार्थ्यांची घोषणा होईल तसेच त्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. या कार्यक्रमास नवउद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.