कोल्हापूर : शहरातील कचऱ्याचा प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक चक्क कचरा उठाव कर्मचारी बनल्याचं दिसून आलं. त्यांनी घरोघरी जाऊन ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याचं नागरिकांना आवाहन केलं. तसेच या निमित्ताने कृष्णराज महाडिक यांनी कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. खासदारांचा मुलगा चक्क कचरा उठाव कर्मचाऱ्याच्या वेशात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
कोल्हापूर शहरात अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये कचऱ्याचा प्रश्नदेखील मोठा आहे. दरम्यान कचरा उठाव करताना किंवा तो झूम प्रकल्पापर्यंत घेऊन जाताना काय हाल होतात हे कृष्णराज यांनी जाणून घेतलं. यावेळी नागरिकांच्या दारात जावून स्वतः कचरा गोळा केला. शिवाय नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं आवाहन केलं.
कृष्णराज महाडिक यांचा कचरा वेचताना आणि नागरिकरांना आवाहन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृष्णराज महाडिक हे करवीर उत्तरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं स्वतः खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आहे. या आधी माध्यमांधी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की, “कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा दावा साहजिक असेल. पण पोटनिवडणुकीमध्ये भाजपने खूप मते घेतली आहेत. भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, नाना कदम यांच्याबरोबर कृष्णराज महाडिक देखील कोल्हापूर उत्तरमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता कुणाला उमेदवारी द्यायची हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा हे ठरवतील.”