सोलापूर : शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना 7/12 आणि 8अ चे ऑनलाईन उतारे ग्राह्य धरावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व संबंधित विभागाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, लिड बँक मॅनेजर संतोष सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार व नाबार्डचे प्रदिप झिले उपस्थित होते.
शंभरकर यांनी बँकांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना चार दिवसांत कर्जपुरवठा करावा. सहकार विभागाच्या 22/05/2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये कर्ज माफीच्या लाभाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप प्राधान्याने करावे, अशा सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे पीक कर्ज उपलब्ध करावे, बँकांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये. ऑनलाईन 7/12 व 8 अ चे उतारे ग्राह्य धरावे. तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकामार्फत संबंधित बँकाकडे प्राप्त झालेल्या कर्ज प्रकरणावर बँकांनी तातडीने कर्जपुरवठा उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना शंभरकर यांनी दिल्या.
बिराजदार यांनी सद्यस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली. नाबार्डचे प्रदिप झिले यांनीही शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक सोनवणे यांनी चार दिवसांत महात्मा जोतीराव फुले व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करुन लक्षांक पूर्ण करण्याबाबत बॅंक प्रतिनिधींना सूचना दिल्या.
शंभरकर यांनी बँकनिहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला. ज्या बँका कर्ज वाटपाचा लक्षांक पुर्तता करणार नाहीत, अशा बँकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही कर्ज वाटपात सुधारणा न झाल्यास बॅंकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. नेमून दिलेल्या उद्दिष्टांच्या केवळ 31% कर्ज वाटप केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.