अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांंच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अकोल्यात हा प्रकार घडला. राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
अमोल मिटकरी यांनी मनसेकडून झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अशा हल्लांना आम्ही भिक घालत नाही, महायुतीत असं करुन सत्तेत येऊ शकतो, असं वाटत असेल तर तसं होणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
अमोल मिटकरी म्हणाले की, “अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला. मनसेचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर उभे होते. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण असे मागून हल्ले करुन काही होणार नाही, ते नपूसंक लोक आहेत. अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.”