*पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 17 जुलै 2024 रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक, वारक-यांना प्रशासनाच्या वतीने चांगल्या दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने प्रयत्नशील आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. या सर्व सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली.
शौचालयाची पाहणी-
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन शौचालयाची व्यवस्था, त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे का? स्वच्छता ठेवण्यात आली आहे का व वारकऱ्यांना शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी हँडवॉश ची ही सोय या ठिकाणी करण्यात आले आहे त्याची पाहणी केली. काही शौचालये स्वतः जिल्हाधिकारी यांनी उघडून पाहणी केली आहे. शौचालय साफसफाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे निर्देश देऊन शौचा उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सक्षम मशीन उपलब्ध करण्याचेही त्यांनी सुचित केले. पंढरपूर शहर व परिसरात सुलभ इंटरनॅशनल शौचालयाची जेवढी शौचालये असतील ती सर्व शौचालये दिनांक 15 ते 21 जुलै 2024 या कालावधीत भाविकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केलेले आहे.
*पंढरपूर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम-
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार पंढरपूर शहरा मध्ये येणा-या लाखो भाविकांना यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर शहरामध्ये दर्शनासाठी जाताना किंवा मंदिर परिसर महाद्वार घाट व प्रदक्षिणा मार्गावर दिंडी घेऊन जात असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तसेच नगर परिषदेने अर्बन बँक ते नाथ चौक, स्वा.सावरकर पुतळा ते महाद्वार, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट व इतर रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे काम चालु आहे.
*वाहनासाठी 13 ठिकाणी पार्किंगची सुविधा व सुरळीत वाहतुकीचे नियोजन –
पंढरपूर शहरामध्ये येणारी वाहने मुख्य रस्त्यावर किंवा प्रदक्षिणा मार्गावर येवुन भाविकांना चालताना अडथळा अथवा त्रास होवु नये म्हणुन सर्व ठिकाणी लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे. तसेच यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भाविकांच्या मोठ्या प्रमाणात येणा-या वाहनांची सोय व्हावी म्हणुन 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच वाळवंटात येणा-या यात्रेकरुंना चालण्यासाठी व पाण्याचे टँकर, जेटिंग मशीन, आरोग्य विभागाची वाहने जाणे-येणेसाठी जुना पुल ते पुंडलिक मंदीरापर्यंत रस्त्याची आखणी करण्यात आली आहे.
*हायमास्ट दिवे-
पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत 9 हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर 200 वॅट एलईडी दिवे लावण्यात आले असुन यात्रा कालावधीत प्रथमच कायमस्वरूपी लखुबाई मंदिर घाट, उद्धव घाट, कुंभार घाट व चंद्रभागा घाट चार ठिकाणी स्टेडियम वर असणारे फ्लड लाईट चे मोठे दिवे बसविण्यात येणार आहे सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण वाळवंटात पडणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये १६० एलईडी दिवे व ६ हायमास्ट बसविण्यात आले आहेत. तसेच ६५ एकर भक्ती सागर मध्ये असलेल्या १२ युनिटमध्ये असलेल्या १८०० शौचालयामध्ये विजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरुंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुन नदीच्या वाळवंटामध्ये ७४ नळ बसविण्यात आले आहेत तसेच भक्ती सागर येथेही पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
*स्वच्छता मोहीम –
तसेच वाळवंटात, ६५ एकर व पत्राशेड दर्शनबारी येथे विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रेपुर्वी संपुर्ण वाळवंट स्वच्छ करणेत आले असुन दररोजच्या दररोज नदीपात्र स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने २०० सफाई कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
*24 तास अग्निशमन दल सज्ज-
तसेच नदी पात्र, पत्राशेड दर्शनबारी, ६५ एकर, मंदिर परिसरात व शहरात आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन महत्वाच्या ठिकाणी २४ तास अग्निशमन वाहने उभी करण्यात आली आहेत. वाखरी पालखी तळ, पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट,65 एकर. श्री संत तुकाराम भवन येथे अग्निशमन यंत्रणा उभी करण्यात आली आहे तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशमन वाहनास त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे.
*पिण्याच्या पाण्याची व्यवस्था-
भाविकांसाठी यात्रा कालावधीमध्ये मंदीर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गोपाळपुर रोड दर्शन बारी पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व मंदिर परिसरातील १२ विद्युत पंपाद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान १५० टँकर द्वारे संपुर्ण शहरात विशेषतः भक्ती सागर वाळवंट पालखी तळ पत्राशेड ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे.
*नगर परिषदेच्या वतीने 1500 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती-
यात्रा कालावधीत पुर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. नगरपरिषदेच्यावतीने १५०० सफाई कर्मचा-यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहर, वाळवंट, ६५ एकर, पत्रा शेड दर्शनबारी येथे दररोजच्या दररोज स्वच्छता करण्यात येणार आहे. प्रत्येक मोठ्या मठांमध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लेखी पत्राद्वारे सुचना देण्यात आलेल्या असुन कोणत्याही परिस्थितीत कचरा बाहेर टाकु नये सर्व कचरा घंटागाडी कडे द्यावा म्हणुन कळविण्यात आले आहे. तसेच ४१ घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ४ टिपर, २ कॉम्पॅक्टर, १ डंपरप्लेसर, ४ डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज १०० ते १२० टन कचरा उचलण्यात येणार आहे. नदीपात्र, ६५ एकर, पत्राशेड दर्शन बारी व शहरात गर्दीच्या ठिकाणी ५०० पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत. तसेच नागरी हिवताप विभागामार्फत शहरामध्ये डेंगु अथवा इतर आजाराचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन विशेष मोहिम हाती घेतली असुन कंटेनर सर्व्हे, औषध फवारणी व फॉगिंग मशीन द्वारे धुर फवारणी करण्यात येत आहे. बायोकल्चर तंत्राचा वापर करुन जैविक पद्धतीने नदीच्या पात्रात होणारी घाण दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याच्या दृष्टीने फवारणी करण्यात येत आहे.
*भाविकांसाठी शौचालयाची उपलब्धता-
शौचालय नियोजनामध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत व सुलभ शौचालयाची २९ ठिकाणीं २०५४ सीट्स, नगरपरिषदेची कायमची २५ ठिकाणी १७६ सीट्स, ६५ एकर परिसरातील कायम स्वरुपी १२ ठिकाणी १८६४ सीट्स, प्री फॅब्रिकेटेड (नदी वाळवंट, ६५ एकर, पत्राशेड दर्शनबारी, शहरात विविध ठिकाणी) असे एकुण ७० ठिकाणी १९००सीट्स असे शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालावधीत मोकाट जनावरे पकडुन त्यांना नगरपरिषदेने नव्याने बांधण्यात आलेल्या कोंडवाड्यामध्ये कोंडण्यात येत आहे.
*आरोग्य सुविधा-
शहरात यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने, उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने वाखरी पालखी तळ,पत्राशेड, दर्शनबारी , पोलीस संकुल, दर्शन मंडप, ६५ एकर , चंद्रभागा वाळवंटात वेदांत भक्त निवास, नागरी आरोग्य केंद्र काळा मारुती व सारडा भवन, श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहेत. तसेच यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाखरी पालखी तळ, ६५ एकर भक्ती सागर, नदी वाळवंट, गोपाळपुर रोड दर्शन बारी पत्रा शेड, पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय या ठिकाणी आपातकालिन व्यवस्थापन केंद्राची (EOC) स्थापना केलेली आहे.
यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरअभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे व नागनाथ तोडकर, पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे, अभियंता प्रविण बैले, सुहास झिंगे, सोमेश धट, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, जनसंपर्क अधिकारी अस्मिती निकम, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षिरसागर, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, हिवताप अधिकारी शुभांगी अधटराव, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
आषाढी यात्रेमध्ये करण्यात आलेल्या विशेष बाबी
*संपूर्ण पंढरपूर शहरातील असलेल्या पथदिव्यावर एलईडी च्या माळा सोडण्यात येऊन
सुशोभीकरण करण्यात आले आहे.
*नवीन पूल चंद्रभागा वाळवंटामध्ये लेझर किरण द्वारे लेझर लाईट सोडण्यात येणार आहेत.
*चंद्रभागा वाळवंटामध्ये भिंतीवर प्रोजेक्टर द्वारे सर्व युगपुरुषांच्या व संतांच्या माहिती दाखवण्यात
येणार आहे
*शहरांमधील प्रत्येक मुख्य चौकामध्ये वारकऱ्यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत
*ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टॉयलेट्स लावण्यात आले आहेत ते तुंबून नाहक भाविकांना
त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सक्शन मशीन मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहेत
*वाखरी पालखीतळ, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट येथे शौचालयाच्या वापरासाठी वेगळी व्यवस्था
ठेवून पाण्याचे टँकर उभा करण्यात आले आहेत