यंदाचा उन्हाळा सोलापूरसह राज्याला होरफळून टाकणार होता. अंगाची लाही लाही झालेल्या सोलापूरचे तापमान यंदाच्या वर्षी 44 अंशाच्या वर गेले. अशा भयंकर उन्हाचे चटके खाल्लेल्या सोलापूरकरांना सध्या चांगले दिवस आले आहेत. जून महिन्यात सोलापुरात कधीच पाऊस येत नाही. यंदाच्या वर्षी वरून राजा प्रसन्न झाल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच सोलापूर आणि जिल्ह्यात एवढेच नव्हे तर राज्यात तो धो – धो बरसतोय.
सोलापुरात सोमवारी रात्रभर रिमझिम पाऊस होता. मंगळवार उजाडला तोही रिमझिम पावसातच. त्यामुळे गेल्या महिन्यात 44 अंशावर तापमान सहन केलेल्या सोलापुरात सध्या पर्यटन स्थळाप्रमाणे अत्यंत अल्हाददायक वातावरण बनले असून मंगळवारी अवघे 26 अंश इतके कमी तापमान होते. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पाण्याने धुवून निघालेले रस्ते…
पावसात नाहून निघालेली झाडी यामुळे सोलापूरच्या सौंदर्यात भर पडली. ग्रामीण भागात देखील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सांगोला, बार्शी, पंढरपूर, मोहोळ यासह सर्व तालुक्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर मध्ये आजवर तीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पंढरपूरचा येवती तलाव भरून वाहू लागला आहे. सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव देखील भरला.
या पावसामुळे उत्तर सोलापुरातील बीपी तलाव मधील गांधी तलाव निम्मा भरला आहे. मोहोळ तालुक्यातील रानमसले ते खुनेश्वर हा रस्ता पाण्यामुळे बंद झाला आहे. उजनी धरणात दौंड मधून 3700 क्यूसेक् चे वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे जिकडे तिकडे चोहीकडे पाणीच पाणी आणि आल्हाददायक असे पर्यटन स्थळाप्रमाणे वातावरण बनले आहे.