जिल्हाधिकारी यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग, सुरत चेन्नई महामार्ग, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, पालखी महामार्ग, सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग, सोलापूर साठी प्रस्तावित असलेली समांतर पाईप लाईन,करमाळा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर शहरातील उड्डाणपूल आदी पायाभूत प्रकल्पांच्या भूसंपादन विषयक अडीअडचणीचा सविस्तर आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.
सोलापूर, दिनांक 29(जिमाका):- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकास कामे जिल्ह्याच्या विविध भागात सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, पालखी महामार्ग, सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग,सोलापूरसाठी प्रस्तावित असलेली समांतर पाईप लाईन, नगर-करमाळा- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर शहरातील उड्डाणपुलाची कामे या पायाभूत प्रकल्पांचा समावेश होतो. हे सर्व प्रकल्पाचे कामे विहित काल मर्यादित पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या कामात असलेल्या भूसंपादन विषयक अडचणी 15 जून पर्यंत सोडविण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
नियोजन समिती सभागृहात आयोजित पायाभूत प्रकल्पातील भूसंपादन विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी क्रमांक 1 सुमित शिंदे, भूसंपादन अधिकारी क्रमांक 7 प्रमोद गायकवाड, भूसंपादन अधिकारी 11 श्रावण क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विठ्ठल उदमले, सदाशिव पडदुने, विजया पांगारकर, प्रियंका आंबेकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम, केशव घोडके, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह रेल्वे, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादन विषयक ज्या अडचणी येत आहेत त्या संबंधित भूसंपादन अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी एकत्रित बसून त्यावर तात्काळ मार्ग काढावा. संबंधित शेतकरी अथवा अन्य लाभार्थी यांना विहित नियमावलीनुसार मिळणारा मोबदला तात्काळ द्यावा. महामार्गावर येणाऱ्या ज्या गावातील शेतकरी, नागरिक यांनी महामार्गाचे काम अडवले आहे, त्यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा. जे लाभार्थी महामार्गात गेलेल्या जमिनीचा ताबा देणार नाहीत अशा ठिकाणी विहित नियमावलीचा वापर करून पोलीस बंदोबस्तात ताबा घेऊन त्या ठिकाणची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
सुरत-चेन्नई महामार्गासाठी 678 प्रकरणात एकूण 534 कोटीचा निधी भूसंपादनासाठी मंजूर झालेला आहे. त्या अनुषंगाने आज पर्यंत 295 कोटीचे वाटप झालेले आहे. परंतु अक्कलकोट तालुक्यातील 17 गावांमधील शेतकरी, ग्रामस्थ भूसंपादनासाठी अर्ज करत नाहीत. त्याचप्रमाणे अक्कलकोटसह बार्शी, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यातील 178 प्रकरणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी विशेष कॅम्प लावावेत. जमीन मोजणीची कार्यवाही भूमी अभिलेख कार्यालयाने पूर्ण करावी त्यासाठी आवश्यक असलेले शुल्क कोणी भरावे याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
कृष्णा -मराठवाडा प्रकल्पातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 604 हेक्टर क्षेत्र भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली असून, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ उत्तर सोलापूर व करमाळा तालुक्यातील 122 हेक्टर क्षेत्र भूसंपादनाबाबत कार्यवाही संबंधित विभागाने त्वरित पूर्ण करावी. तसेच यातील 28 हेक्टर क्षेत्र भूसंपादनाच्या अनुषंगाने खाजगी वाटाघाटी करून कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. त्याचप्रमाणे पालखी महामार्गावरील भूसंपादनाच्या बाबतीत सर्व अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ,उपविभागीय अधिकारी , संबंधित पोलीस निरीक्षक यांनी संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करावी. नगर- करमाळा- टेंभुर्णी महामार्गाचे सोलापूर जिल्ह्यातील 60 किलोमीटरच्या रस्त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी संयुक्त मोजणी मोहीम राबवावी, असे त्यांनी सूचित केले.
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. तसेच सोलापूर शहरातील दोन उड्डाणपलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सोलापूर महापालिकेच्या वतीने राबवली जात आहे. त्या अनुषंगाने ज्या अडचणी केंद्र शासनाच्या रेल्वे, डाक विभाग तसेच राज्य शासनाच्या पोलीस विभागाकडून भूसंपादनाच्या अडचणी येत आहेत त्या संबंधित विभागाशी समन्वय साधून त्वरित पूर्ण कराव्यात. या अनुषंगाने लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.
यावेळी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांकडून त्यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती बैठकीत सादर केली. या विकास प्रकल्पातील भूसंपादन विषयक अडचणीच्या अनुषंगाने भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख सर्व संबंधित यंत्रणाची समन्वय ठेवणार आहेत.