सोलापूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीसारख्या परिस्थितीत स्थलांतरित कामगारांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रिसिजन उद्योगसमूहाकडून तब्बल १२०० कामगारांच्या भोजनाची सोय करण्यात आली.
सोलापूर रेल्वे स्टेशन येथून बुधवार दि. २० मे रोजी शेकडो कामगार उत्तर भारतात जाण्यासाठी जमा झाले होते. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन मा. यतिन शहा व प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या पुढाकारातून या कामगारांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय प्रिसिजन उद्योगसमूहाकडून करण्यात आली. उद्योगवर्धिनी महिला बचतगटाने बनविलेले फूड पॅकेट्स कामगारांना देण्यात आले. तसेच स्पेनका कंपनीच्या सहकार्याने पाण्याच्या बाटल्याही देण्यात आल्या. या उपक्रमासाठी रेल्वे प्रशासन, पोलिस प्रशासन, उद्योगवर्धिनीच्या चंद्रिकाभाभी चौहान, स्पेनका कंपनीचे श्री. सुहास आदमाने यांनी मोठे सहकार्य केले. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सोशल डिस्टनसिंग पाळत उद्योजक केतन वोरा यांनी उत्कृष्ट नियोजन करत हा उपक्रम पार पाडला. यावेळी श्री. वोरा यांच्यासह प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, दिपक रजपूत, सिद्धेश्वर चंदनशिवे हे उपस्थित होते. रोजगार गमावल्याने आपल्या राज्याकडे परतणाऱ्या कामगारांसाठी ही मदत मोठी दिलासादायक ठरली.