- बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी आषाढी वारी निमित्त मुख्यमंत्री यांच्या हस्ते पहाटे 2:30 वाजता शासकीय महापूजा होणार
- दिनांक 6 ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होणार
- 10 मानाच्या पालख्या यांची मुक्कामी ठिकाणे व रिंगण सोहळा ठिकाणी सर्व आवश्यक पायाभूत सोयीसुविधा 15 जून पूर्वी उपलब्ध करून द्याव्यात
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम वापरली जाणार, ही सिस्टीम वापरणारा सोलापूर जिल्हा राज्यात एकमेव
सोलापूर : पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी भरते. यावर्षी दिनांक 17 जुलै 2024 रोजी पहाटे 2.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. तर 6 ते 21 जुलै 2024 हा यात्रा कालावधी असून या कालावधीत दहा ते बारा लाख वारकरी पंढरपूर येथे येतात. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ही आषाढी वारी यशस्वी होण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी 2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकुर, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके, माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरण चे अधीक्षक अभियंता श्री. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाने आषाढी वारी निमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. तसेच इतर विभागाकडून त्यांच्या विभागाशी संबंधित कामे ही त्या त्या विभागाशी पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावीत. आषाढी वारीत सर्व मानाच्या पालख्या त्यांच्या समवेत येणाऱ्या दिंड्या व लाखो वारकरी भाविक यांना प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या आषाढी वारीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे विषय स्वतंत्रपणे काढून त्यासाठी उप विभागीय अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी एकत्रित बसून महत्त्वपूर्ण विषय कशा पद्धतीने मार्गी लावता येतील याचे नियोजन करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी पालखी मार्गातील जे किरकोळ कामे राहिलेली आहेत ते तात्काळ पूर्ण करावीत. पंढरपूर नगर परिषदेने वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात स्वच्छता चांगली राहील यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच वारीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा उत्कृष्ट राहतील याची खात्री करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
अन्न औषध विभागाने वारी कालावधीत सर्व हॉटेल्स व त्यातील अन्नपदार्थाची तपासणी करावी. भेसळ करणाऱ्या हॉटेल्स विरोधात कठोर कारवाई करावी. त्या पद्धतीनेच विविध मठाच्या माध्यमातून किंवा काही व्यक्तीकडून अन्नदान केले जाते त्या अनुषंगाने संबंधित अन्नपदार्थाची तपासणी करावी. वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर पत्रा शेड, 65 एकर या ठिकाणी आवश्यक कार्यवाही करावी. पुरवठा विभागाने पंढरपूर शहरात व पालखी महामार्गावर आवश्यक ठिकाणी गॅस सिलेंडरची तपासणी मोहीम चोखपणे राबवावी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच मंदिर समितीने दर्शन रांगेत भाविकांना आवश्यक सर्व सुविधा सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, रांगेत घुसखोरी होणार नाही यासाठी पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा. तसेच प्रत्येक शासकीय विभागाकडून वारीनिमित्त करण्यात येणारी सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत 15 जून पूर्वी पूर्ण झाले पाहिजेत, असेही त्यांनी सुचित केले.
मंदिर परिसरात अतिक्रमणे होऊ नये यासाठी सर्व संबंधित लोकांना नगरपरिषदेने निर्देशित करावे. आषाढी यात्रा पूर्वीच पर जिल्हा व राज्यातून मोठ्या प्रमाणावर फेरीवाले येऊन मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणे करतात, अशी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेचे खबरदारी घ्यावी. संपूर्ण यात्रा कालावधीत पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी दिली. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे. हा सोहळा खूप मोठा असल्याने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे यावर बारकाईने लक्ष आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवून कामकाज करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गात येत असलेली अनाधिकृत बांधकामे हटवून पालखी मार्ग मोकळा करावा. अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर शहरात तपासणी मोहीम राबवण्याबरोबरच अनेक मठाकडून अन्नधान्य केले जाते त्याचीही तपासणी करावी. प्रसाद व अन्नात कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी दिले. प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी आषाढी वारी 2024 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती सविस्तरपणे देऊन अन्य विभागाकडून वारी कालावधीत भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा विषयी करावयाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती दिली.
आय आर एस सिस्टीम-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आषाढी कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडली तर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली (इन्सिडेंट रेस्पोंस सिस्टीम) वापरण्यात येत आहे. ही सिस्टीम वापरणारा सोलापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. ढोले यांनी दिली. तसेच पालखी मार्ग व पंढरपूर शहरात 42 आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे स्थापन करण्यात आलेली असून ही केंद्रे यात्रा कालावधीत 24 तास कार्यान्वित राहणार आहेत.