महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा घ्यायला नको अशा आशयाचं पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी UGC ला लिहिलं आहे. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव ज्या प्रकारे वाढतो आहे तो लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि हिताच्या दृष्टीने आम्ही विचार करतो आहोत. अशा परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नाही हेदेखील आम्ही UGC ला कळवलं आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.
- काय म्हटलं आहे पत्रात?
कोविड १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि त्या अनुषंगाने झालेल्या लॉकडाउनमुळे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सर्व आकृषी विद्यापीठांमधील परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र सरकारने समिती नेमली होती
दि. ८ मे रोजी शासनाने सदर समितीचा अहवाल स्वीकृत केला. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अकृषी विद्यापीठांमधल्या पदवीपूर्व, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.