नवी दिल्ली : लॉकडाऊनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरु झाला. देशातल्या अनेक राज्यांनी या चौथ्या टप्प्यात महत्वाचे बदल केलेत. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूकही सुरु होताना दिसतेय. महाराष्ट्रात मात्र चौथ्या टप्प्यातही अद्याप कुठली नवी शिथीलता पाहायला मिळत नाही. भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
दिल्ली, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक देशातील अशा अनेक राज्यांनी चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनमध्ये अधिक शिथीलता आणली आहे. कुठे सार्वजनिक बस नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहेत. तर कुठे जीवनावश्यक वगळता इतर दुकानंही सुरु होत आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राज्यांना मिळाल्यानंतर अनेक राज्यांत हे बदल पाहायला मिळत आहेत.
केरळ
केरळमध्ये 50 टक्के क्षमतेसह बस वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी आसन क्षमता कमी केल्यानं बसच्या तिकीटातही वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे केरळमध्ये सलून, ब्युटी पार्लर्सनाही परवानगी देण्यात आली असून या ठिकाणी एसी लावण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच फक्त बेसिक सुविधाच ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात याव्यात, अशी अटही प्रशासनाने घातली आहे. केरळमध्ये सध्या 630 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तसेच भारतात कोरोना पहिला रुग्ण केरळ राज्यातच आढळून आला होता. परंतु, केरळ सरकारने ही संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलं आहे.
कर्नाटक
कर्नाटकमध्येही काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून काही गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये एका बसमध्ये 30 प्रवासी या अटीवर सार्वजनिक वाहतुकीस परवानगी दिली आहे. रेड झोन वगळता इतर ठिकाणी ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालकांनाही एकावेळी फक्त दोन प्रवासी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कर्नाटक सरकारने महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांना 31 मेपर्यंत राज्यात येण्यास बंदी घातली आहे.
दिल्ली
देशाच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्येही कोरोनाचा कहर दिसून येत आहे. दिल्ली सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑड-इव्हन पद्धतीने ही दुकानं उघडण्यात येणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. त्याशिवाय एका बसमध्ये 20 प्रवासी आणि टॅक्सी कॅबमध्ये फक्त दोन प्रवासी या अटींवर वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. ऑटो रिक्षा आणि ई रिक्षालाही केवळ एक प्रवासी नेण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीतील कोरोना बाधितांची संख्या दहा हजारांच्या आजपास आहे.
तामिळनाडू
महाराष्ट्रापाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असलेले राज्य म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूतही काही बंधनं शिथील करण्यात आली आहेत. ज्या 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त आहे तिथे त्यांनी शिथीलता दिली नाही. पण इतर 25 जिल्ह्यांमध्ये मात्र बऱ्याच सवलती देण्यात आल्या आहेत.