सोलापूर (प्रतिनिधी ): महापालिकेत कार्यालयीन वेळेत कामावर उशिरा येणारे गुरुवारी पुन्हा २५ कर्मचारी आढळून आले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानक केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली.
बुधवारी महापालिका उपायुक्त लोकरे यांनी अचानक केलेल्या पाहणीत ८२ कर्मचारी उशिरा आले असल्याचे निदर्शनास आले होते. गुरुवारी दुसऱ्या दिवशी महापालिकेत २५ कर्मचारी कामावर उशिरा आले असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानक पाहणी केली.
महापालिकेतील प्रशासकीय इमारतीमधील संगणक विभाग, कर संकलन विभाग, ऑडिट विभाग, अकाउंटंट विभाग, शहर सुधारणा, गवसू, भूमी मालमत्ता, अभिलेख, आरोग्य विभाग
यासह विविध विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी आज २५ कर्मचारी उशिरा आल्याचे दिसून आले तर भूमी मालमत्ता विभागात कार्यालयीन वेळेत शंभर टक्के कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले.
उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही मात्र त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे नियमाने आवश्यक आहे. कार्यालयीन शिस्त पाळणे गरजेचे आहे. याचे भान राखून कर्मचाऱ्यांनी काम केले पाहिजे, असे उपायुक्त लोकरे यांनी स्पष्ट केले.