मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक;आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा
सोलापूर-(जिमाका) दि.14:- मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेवून मान्सून पूर्व कामे वेळेच्या आत पुर्ण करावीत. तसेच मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज व अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, रो.ह.यो.उपजिल्हाधिकारी चारूशीला देशमुख,जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने ,आपत्ती वय्वस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त् संदिप कारंजे, महावितरणचे कार्य.अभियंता संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले ,जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, मुख्य अग्निशमन अधिकारी केदार आवटे, यांच्यासह जिल्ह्यातील प्रातांधिकारी, तहसिलदार तसेच संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यातील मोठे व मध्यम तसेच सर्वच प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित 105 गावे असून, पूर परिस्थितीमध्ये काय करावे व काय करू नये या बाबतच्या उपाययोजनांची जाणीव करून देण्याकरिता पूरग्रस्त गावातील लोकप्रतिनिधी, सेवाभावी, सामाजिक संस्था यांनी नागरिकांना प्रशिक्षण द्यावे तसेच सर्व स्तरावर जनजागृती करावी. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला आराखडा दि. 20 मेपूर्वी सादर करावा. तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करावा. पावसाळ्यात जनावरांची रोगराई नियंत्रणात ठेवण्याबाबत पशूसंवर्धन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज कोठे पडणार आहे याची माहिती देणारे दामिनी ॲप हवामान विभागाने तयार केले आहे. जिवितहानी टाळण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा अधिकाऱ्यांनी या बाबत दक्षता घेवून संबधित ठिकाणी आवश्यक माहिती द्यावी .आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली यंत्रणा व साधने सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा करून तसे प्रमाणपत्र, अहवाल सादर करावा. वारंवार आपत्तीची घटना घडणा-या ठिकाणी सूचनाफलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शहरी भागामध्ये नाले, ड्रेनेज तुंबल्याने गटारांचे पाणी बोरवेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये मिसळून साथीचे रोग निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधीसाठा व इतर अनुषंगिक साहित्याची उपलब्धता ठेवावी. गावागावात बचाव पथके प्रशिक्षित करणे, होडी, यांत्रिकी बोटी, पोहणारे आदी साधनसामुग्रीची उपलब्धता तपासावी. पुरपरिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवारा, मुलभुत सोयी देण्यासाठी नगरपालिका व तहसिल विभागाने नियोजन करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, पाऊस वादळ प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी.तसेच शहर आणि ग्रामीण भागात अनधिकृत होर्डिंगची तपासणी करून कारवाई करुन तात्काळ धोकादायक होर्डिंग काढण्यात यावेत असे निर्देशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी दिले.
यावेळी पूरस्थितीबाबत पूर्व सूचना व प्रसारण व्यवस्था, मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या गावे, पूर परिस्थितीत नदीवरील पाण्याखाली जाणारे जिल्ह्यातील सर्व पूल तसेच पाण्याचा विसर्ग याबाबत आढावा घेण्यात आला.