सोलापूर (प्रतिनिधी) : शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोव्हीड रूग्णालयांची गरज भासणार आहे. प्रशासनाची हीच गरज ओळखत आ. सुभाष देशमुख यांनी एक चांगले पाऊल उचलत निलम नगर येथील लोकमंगल जैविक हॉस्पिटल हे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी आ. देशमुख यांनी पालिका आयुक्त दिपक तावरे यांची भेट घेत कोरोना नियंत्रणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर लागलीच आ. देशमुख यांनी हा मोठा निर्णय घेतला. सध्या या रूग्णालयात 40 रूग्णांना ऍडमिट करण्याची सोय आहे. येथे रूग्णांचे स्वॅब घेण्याची सोयही केली जाणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास रूग्णांना घरी पाठवण्यात येणार आहे. सध्या हॉस्पिटलचा एकच मजला वापरण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये असलेले इतर रूग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर संपूर्ण हॉस्पिट कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. आ. देशमुख यांनी हा निर्णय पालिका आयुक्तांना कळवल्यांनतर रविवारी सकाळी पालिका आयुक्त तावरे आणि पालिकेेच्या आरोग्य पथकाने या रूग्णालयाची पहाणी केली. यावेळी आ. सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी जास्त करून सारीचे रूग्ण ठेवण्यात येतील, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य – आ. सुभाष देशमुख
कोरानाग्रस्तांच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये जागा कमी पडत आहे. यावर उपाययोजना व्हावी यासाठी लोकमंगल जैविक हॉस्पिटल उपचारासाठी देण्याचा निर्णय आम्ही व हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाला शक्य ती सर्व मदत करण्याचा माझा व लोकमंगल परिवाराचा प्रयत्न असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.