सोलापूर – सोलापूर व माढा लोकसभेसाठी मंगळवार ७ मे रोजी मतदान होणार आहे. आज दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३ हजार ६१७ मतदान केंद्र असून मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वाढत्या उष्णतेमुळे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज आल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सावलीची सुविधा, पिण्याचे पाणी, प्रत्येक मतदान केंद्रावर ३० ओ. आर. एस. पॉकेट, मतदान रांगेत ठराविक अंतरात खुर्च्या किंवा बेंचची सुविधा, स्वयंसेवक, मोबाईल हेल्थ टीम, प्रथमोपचार किट, हिरकणी कक्ष या उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था, मतदान केंद्राची आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता, शौचालयाची स्वच्छता सह अन्य सर्व सोयी सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तरी सोलापूर शहरातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.