परभणी : विदर्भ आणि मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणूक प्रचारांच्या तोफा आज थंडावणार आहेत. येथील मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होत असून तत्पूर्वी बड्या नेत्यांनी प्रचाराच्या मैदानातून आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच लावली आहे. अमरावतीमध्ये आज केद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा होत आहे. तर, परभणीमध्ये शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंची मंगळवारी सभा पार पाडली. या सभेतून भरपावसात उद्धव ठाकरेंनी परभणीकरांना साद घालताना, समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन केलं. उद्धव ठाकरेंच्या या सभेतील विधानावर रासपचे प्रमुख आणि परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर आज परतूर तालुक्यात सभा,पदयात्रा करत आहेत.मागच्या महिन्याभरामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला आपलंसं केलं.मी जवळपास 90 टक्के मतदारसंघ फिरलोय, लोकं माझ्या पाठीशी आहेत. लोकसभा निवडणुकीत माझी लीड साडेचार लाखांची राहील, आणि मी जर परभणीतून निवडून आलो नाही तर संन्यास घेईल, अशी घोषणाच महादेव जानकर यांनी केली.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराचा शेटवचा दिवस असून सभांचा धडाका सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरेंच्या परभणीतील सभेला प्रत्त्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्याचं पोरगं मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखा बहुजन पोरगा खासदार झालेला देखवत नाही का, असा सवाल महादेव जानकरांनी विचारला. तसेच, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.