सोलापूर : दलितमित्र शिक्षणमहर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त मागास समाजसेवा मंडळचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू नगर येथील चंद्राम गुरुजी सांस्कृतिक भवन डीएड कॉलेज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी देशाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावना सुभाष चव्हाण यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून वालचंद कॉलेजचे प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण, माझा समाजसेवा मंडळाचे खजिनदार नामदेव चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे , सुरेश हसापुरे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
गुरुजींचा असा होता प्रवास
13 एप्रिल 1925 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी दलित मित्र चंद्राम चव्हाण गुरुजींचा जन्म कर्नाटकातील इंडी तांड्यावर झाला. अत्यंत दैन्य, दारिद्र्य, मागासलेपणा असलेल्या लमाण जमातीत चंद्राम चव्हाण गुरुजी जन्मले. कोरवली येथील शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विंचूर येथील शाळेत सातवीपर्यंत शिक्षण अत्यंत हालअपेष्टा सहन करत चंद्राम चव्हाण गुरुजींनी घेतले. शाळेत प्रथम क्रमांक येऊन देखील दारिद्र्या मुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. काही काळ रोजगार हमीवर गॅंगमन म्हणून रोड कामावर मुकादम होऊन तर लक्ष्मी विष्णू मिलमध्ये मुकादम म्हणून त्यांनी काम केले. आई-वडिलांबरोबर विहिरी खोदल्या ज्वारी काढली बिल्डिंग खात्यात गॅंगमन म्हणून देखील काम केले. 1950 साली जिथे सुगी केली त्याच बार्शी तालुक्यातील झरे गावी ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले. तेथून कोरवली येथे बदलून आल्यानंतर त्यांनी आपल्या घरी साने गुरुजी वस्तीगृहाची स्थापना केली त्यांची पत्नी रुक्माई व चंद्राम गुरुजींनी वस्तीग्रहातील मुलांचा पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ केला. कमळे गुरुजींच्या सोबतीने चंद्रा चव्हाण गुरुजींनी लमान समाजातील तांड्यांवरील व्यसनाधीनता तसेच वाईट रूढी परंपरा घालून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्याकरिता कमळे गुरुजींच्या मदतीने दारूबंदी करिता प्रयत्न केले तसेच तांड्यांवर शाळा काढल्या व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मानल्या जाणाऱ्या लमान समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. कमळे गुरुजींच्या मदतीने चंद्राम चव्हाण गुरुजींनी लमान समाजासाठी 20 हाउसिंग सोसायटी व 19 फार्मिंग सोसायटी यांची स्थापना केली व निराश्यतांना घर आणि कसल्या शेती मिळवून दिली. चंद्राम चव्हाण गुरुजींवर साने गुरुजी संत तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज इत्यादींचा मोठा प्रभाव होता त्यामुळे भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचे काम त्यांनी केले. लमान समाजातील अंधश्रद्धा व्यसनाधीनता दारू गाळण्याची क्रिया या सर्वांच्या विरोधामध्ये त्यांनी प्रबोधन केल्याने दांड्यावरील लोकांनीच त्यांना विरोध करायला सुरुवात केली परंतु चंद्राम गुरुजी आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत. चंद्राम चव्हाण गुरुजी हे करते सुधारक होते त्यांनी लोकांना कमी खर्चात लग्न करावयास सांगितले त्याचे पालन व्यक्तिगत जीवनात करत असताना आपल्या दोन मुलांचा विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात घडवून आणला.
1950 साली स्थापन केलेल्या लमान सेवा मंडळाचे मागास सेवा मंडळात रूपांतर करून त्यांनी नेहरूनगरला एक सशक्त असे शैक्षणिक केंद्र बनवले. ‘आज परिश्रम कल लाभ’ हे ब्रीदवाक्य ठेवून आपल्या संस्थेची वाटचाल त्यांनी केली. अनेक शाळा महाविद्यालय आश्रम शाळा सुरू करून सोलापूर शहर व जिल्ह्यातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे आज 15000 विद्यार्थी त्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत तर 500 हून अधिक व्यक्तींना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आंध्र प्रदेशातील संत सेवालाल यांचे जन्मस्थान असलेल्या सेवा गड येथे सेवालाल महाराजांचे मंदिर बांधण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राजकीय जीवनात अनेक पदे चंद्राम गुरुजींनी भूषविली परंतु त्याचा दर्प कधीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्पर्श करता झाला नाही. अनेक पुरस्कारांनी चंद्राम चव्हाण गुरुजींच्या कार्याचा गौरव झाला. 94 वर्षांचे दीर्घायुष्य हे दलित मित्र चंद्राम चव्हाण गुरुजींना लाभले. चंद्राम चव्हाण गुरुजींची जयंती साजरी करीत असताना त्यांनी आयुष्यभर दीनदुबळ्यांच्या साठी वंचितांच्या साठी केलेल्या कार्याचे स्मरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण हे याप्रसंगी म्हणाले.
यावेळी आभार जयवंत हाके यांनी मानले तर सर्व प्रशालेचे प्राचार्य मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..