राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी-विदेशी दारु व हातभट्टी दारु वाहतूक करणा-यांविरुद्ध कारवाई करुन 2 कार, ऑटोरिक्षा व दोन दुचाकी वाहने जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून याच मोहिमे अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू पिरप्पा ठणकेदार, वय 27 वर्षे राहणार मड्डी वस्ती हा त्याच्या हिरो होंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH13 CF 6174 वरून दोन रबरी ट्यूबमध्ये 160 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एका अन्य कारवाईत याच पथकाने भुलाबाई चौक येथे सापळा रचून एका ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 1363 मधून अमर बाबु राठोड वय 26 वर्षे व राहुल बाबु राठोड वय 35 वर्षे दोघेही राहणार बक्षीहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर हे हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्या ताब्यातून चार रबरी ट्यूबमधील 320 लिटर हातभट्टी दारूसह एकूण 1 लाख ब्यांशी हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे, अशोक माळी व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांगोला शहरात ज्ञानेश्वर तायप्पा कारंडे वय 50 वर्षे राहणार घेरडी ता. सांगोला या इसमास हिरो होंडा शाईन क्रमांक MH13 BK 6809 वरून देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या वाहतूक करताना पकडले. याच पथकाने मांजरी ता.सांगोला गावाच्या हद्दीत विनोद महादेव चंदनशिवे वय 27 वर्षे राहणार संगेवावाडी ता. सांगोला या इसमास त्याच्या मारुती वॅगनर क्रमांक MH04-DJ-3829 कारमधून देशी दारूच्या 180 मिलीच्या 192 बाटल्यांची वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह दोन लाख तेविस हजार चारशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले, जवान तानाजी काळे व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.
पंढरपूरच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी गावाच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे, वय 23 वर्षे रा. घोटी ता. माढा हा इसम त्याच्या मारुती सुझुकी कार क्रमांक MH45 AQ 0173 मधून कागदी पुट्ठ्याच्या बॉक्समध्ये 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 192 बाटल्या व ब्रॅंडीच्या 96 बाटल्या वाहतूक करीत असताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण चार लाख 74 हजार 288 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 172 गुन्हे नोंदविण्यात आले असून चोविस वाहनांसह बासष्ट लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.