सोलापूर : धैर्यशील मोहिते – पाटील यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र, त्यांनी असे करायला नको होते. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला, आता आमची लढाई आम्ही लढू, अशा स्पष्ट शब्दांत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धैर्यशील यांच्या पक्ष सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याच्या निर्णयावर निर्वाळा दिला. तसेच आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील हे महायुतीसोबत राहतील, असाही विश्वास व्यक्त केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बैठक व मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सोलापुरात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. धैर्यशील यांचा राजीनामा आज मिळाला असून तो स्वीकारल्याचे सांगून ते म्हणाले, आम्ही मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा जपण्यात कोठेही कमी पडलो नाही. आम्ही त्यांची प्रतिष्ठा, मानसन्मान उंच ठेवण्याचा, त्यांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असला तरी जनता मोदी यांच्या पाठीशी आहे. तसेच आमदारकीच्या राजीनाम्याबाबत रणजितसिंह मोहिते- पाटील हे काही बोलले नाहीत. परंतु त्यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. ते महायुतीसोबत राहतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.