मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभेच्या पाच उमेदवारांची यादी यापूर्वी जाहीर झाली आहे. उद्या उर्वरित पाच लोकसभा जागांची उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केली जाणार आहे. दुसऱ्या लिस्टमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघ, भिवंडी लोकसभा मतदारसंघ, बीड लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ आणि सातारा या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असणार आहे. उद्या जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उर्वरित लोकसभेच्या जागांची घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. त्यामुळे उद्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उर्वरित पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहेत. त्यामुळे कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.