रोड शो ने केला प्रचाराचा शुभारंभ
सोलापूर : प्रतिनिधीढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे सोमवारी स्वागत झाले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासह शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत शहरातून फेरी काढण्यात आली.
आ. राम सातपुते यांचे सोमवारी दुपारी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करीत त्यांचे स्वागत केले.
यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, सोलापूरचे हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना त्यांनी अभिवादन केले.
यानंतर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर, श्री मार्कंडेय मंदिर, श्री आजोबा गणपती मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा श्री बसवेश्वर महाराज, तुकाराम कन्ना यांना अभिवादन करुन दाजी पेठ येथील श्रीराम मंदिरात भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आरती केली. मार्कंडेय उद्यान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन रोड शो चा समारोप करण्यात आला. यावेळी कॉर्नर सभेत उमेदवार राम सातपुते यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा निवडणुक प्रमुख विक्रम देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.